पवारांनी केलेले शिंदेंचे कौतुक हाच राऊतांचा पोटशूळ! मंत्री उदय सामंत यांची टीका

12 Feb 2025 17:24:37
 
uday samant
 
नवी दिल्ली : शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक हाच खरा संजय राऊतांचा पोटशूळ आहे, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उदय सामंत म्हणाले की, "ज्या संस्थेने एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला त्यांना ते पात्र वाटले असावेत. शरद पवार साहेबांनादेखील एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार योग्य वाटल्याने ते सत्काराला उपस्थित राहीले आणि त्यांचे कौतुक केले. पण शरद पवार महाविकास आघाडीचे नेते असताना त्यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि त्यांचे कौतुक केले हाच खरा पोटशूळ आहे. स्वत:चे कौतुक आणि सत्कार होत नसल्याने हा पोटशूळ असावा," असे ते म्हणाले.
 
हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान!
"साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे असे संजय राऊत म्हणाले. परंतू, हा शासनाचा अपमान नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा, साहित्यिकांचा आणि मराठी भाषेचा अपमान आहे. साहित्यिकांनी दलालांची उपमा देणे या गोष्टीचा मी निषेध करतो," असेही उदय सामंत म्हणाले.
Powered By Sangraha 9.0